मुंबई : ST bus strike : एसटी संप कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे (Maharashtra Essential Services Maintenance Act (MESMA) हत्यार उपसणार आहे. अद्याप कामावर न आलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने निर्वाणीचा इशारा देताना मेस्मा लावण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हा संप मिटणार की चिघळणार याकडे लक्ष लागले आहे.
आज दुपारी मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी अधिकाऱ्यांची बैठक होत असून या बैठकीत मेस्मा कायदा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची त्यांची मागणी कायम आहे.
सुमारे 9 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करूनही संप मागे घेतला जात नसल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लावण्याची शक्यता आहे. मेस्मा कायद्यानुसार एसटी महामंडळाला संपकरी कर्मचाऱ्यांवर आणखी कडक कारवाई करता येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच आहे. सरकारमध्ये विलिनीकरणाशिवाय मागे हटणार नाही, यावर कर्मचारी ठाम आहेत. सध्या तरी 18 हजार 882 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र, जे कामावर रुजू झालेले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 9 हजार 141 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर 1 हजार 928 जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.