मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. अजूनही राज्यात संसर्गाचं प्रमाण मोठं आहे. पण दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.
दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दहावीची परीक्षा घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 10वीचा निकाल वेगवेगळ्या फॉर्म्युला वापरून लावला ते 11 वीच्या प्रवेशाबाबत गोंधळ उडेल असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या एसएससी बोर्डाच्या तसेच अन्य बोर्डांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
धंनजय कुलकर्णी यांनी या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.