दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सव्वाशे वर्षांहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या मुंबईतील डब्बेवाल्यांच्या संघटनेत फूट पडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे यविरोधात काही डबेवालेच पुढे आले असून त्यांनी ही फूट पाडणाऱ्यांविरोधात आघाडी उघडली आहे. डबेवाल्यांचे प्रवक्ते म्हणून मिरवणारे सुभाष तळेकर यांनी हे फुट पाडण्याचे काम सुरू केले असून डबेवाल्यांच्या नावे त्यांनी लाखो रुपये लाटल्याचा आरोपही डबेवाल्यांनी केलाय.
मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करणाऱ्या या डब्बेवाल्यांना तब्बल 129 वर्षांची परंपरा आहे. मागील 129 वर्ष अव्याहतपणे डबेवाले मुंबईकरांची सेवा करतायत. त्याचबरोबर डब्बेवाल्यांची ही ऐकीही मागील 129 वर्ष टिकून आहे. मात्र डबेवाल्यांची ही ऐकी फोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप डबेवाल्यांनी केलाय. डबेवाल्यांचे प्रवक्ते म्हणून मिरवणारे सुभाष तळेकर डबेवाल्यांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचा डबेवाल्यांचा आरोप आहे.
- डबेवाल्यांच्या संस्थेच्या घटनेत प्रवक्तेपदाची तरतुदच नाही
- सुभाष तळेकर यांनी बेकायदेशीरपणे स्वतःला प्रवक्ते केले
- काही डबेवाल्यांना हाताशी धरून त्यांनी ही बेकायदेशीरबाब केली आहे
- स्वतः सुभाष तळेकर यांनी कधीच डबे वाहिले नाहीत
- तळेकरांनी डबेवाल्यांची बेकायदशीररित्या बेवसाईट सुरू केली
- या वेबसाईटवर संस्थेचा पत्ता आणि नंबर न देता स्वतःचा घऱचा पत्ता आणि नंबर दिले
- संस्थेचे लटरहेड छापून त्यावरही घरचा पत्ता आणि स्वतःचे नंबर दिले
- डबेवाल्यांच्या नावावर मॅनेजमेंटची व्याख्याने दिली
- त्यातून येणारे पैसे स्वतः लाटले, संस्थेला एकही पैसा दिला नाही
- डब्यांवरील जाहीरातीचे पैसेही तळेकरांनी लाटले
या आरोपांबाबत सुभाष तळेकर यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी स्वतः बोलण्यास नकार दिला, याबाबत माझी नियुक्ती केलेले अध्यक्ष उल्हास मुके बोलतील असे सांगितले. डबेवाल्यांच्या नावाने होणारी व्याख्याने आणि जाहीरातींचे पैसे तळेकर यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे मुके यांनी मान्य केलंय. मात्र ते नियमानुसार होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
ज्या डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटचे कौतुक जगभर होते, त्याच डबेवाल्यांमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकरणाची डबेवाल्यांनी मुखअयमंत्र्यांसह सर्व पक्षाचे प्रमुख नेते, पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच सुभाष तळेकर यांच्याकड़ून येणाऱ्या बातम्यांची दखल माध्यमांनी घेऊ नये असं आवाहनही या डबेवाल्यांनी केलंय. डबेवाल्यांमध्ये पडलेली ही फुट मिटवण्यासाठी अंतर्गत समझोता करण्याचाही काही डबेवाले प्रयत्न करत आहेत.