मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये आज दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपासोबत सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मनसेचे सात पैंकी सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं जोरदार दणका दिलाय. या राजकीय नाट्यात मनसेची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी झालीय.
'पुढल्या काही महिन्यांत भाजपाचं महापालिकेत बहुमत होईल...' अशी प्रतिक्रिया गुरुवारी भांडूपमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार जागृती पाटील यांचा विजय झाल्यावर खासदार किरीट सोमय्यांनी व्यक्त केली होती. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधल्या सत्तासंघर्षाची चुणूक यातून दिसली आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं सोमय्यांना पलटवार दिला.
मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांच्यासह अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, हर्षला मोरे आणि दत्ताराम नरवणकर हे सहा नगरसेवक शिवसेनेनं आपल्या गळाला लावलेत.
या सहा नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत पत्र कोकण भवनात विभागीय आयुक्त कार्यालयात दिलं आणि लगोलग शिवसेना गटनेते यशवंत जाधव यांनी या सर्वांना प्रवेश देत असल्याचं पत्रही दिलं. या फोडाफोडीच्या राजकारणात दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या... हे नगरसेवक शिवसेनेत जाण्यासाठी कोकण भवनाकडे निघाले असताना गट नोंदणी करणारे अधिकारी, प्रादेशिक उपसंचालक सुधाकर जगताप आणि तहसिलदार राजेश वैष्णव यांना तातडीनं मंत्रालयात बोलवण्यात आल्यामुळे अऩेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मनसे नगरसेवक शिवसेनेमध्ये जाऊ नयेत, यासाठी भाजपानं ही खेळी खेळल्याचं मानलं जातंय.
अर्थात, महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या बैठकीचं टायमिंग प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे... मात्र, यावर कडी करत कार्यालयामध्ये प्रवेशाची पत्र देत शिवसेनेनं भाजपाचा हा डाव उधळून लावला... दुसरीकडे खासदार किरीट सोमय्या यांनी मनसे मुंबई महापालिकेत घोडाबाजार सुरू असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मनसे नगरसेवकांना फोडून शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या प्रयत्नात भाजपाही असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपापेक्षा शिवसेनेची 'ऑफर' वरचढ ठरल्याची कुजबूज महापालिका वर्तुळात सुरू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हा मोठा धक्का आहे...
ही फोडाफोडी टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसेनं केला. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी कोकण भवनामध्ये विभागीय आयुक्तांना पत्र लिहून स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. असं झाल्यास लोकशाही मूल्यांची पायमल्ली होईल, असं म्हणत वेगळ्या गटाची परवानगी देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी असंही सांगितलं. मात्र या कशाचा उपयोग झाला नाही... सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता घोडाबाजाराच्या चौकशीचा ससेमिरा या नगरसेवकांमागे लावण्याचा पर्याय भाजपासमोर खुला असला तरी मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षात सध्या तरी शिवसेना वरचढ ठरल्याचं दिसतंय.