मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सोनू सूद सामनातून लक्ष्य झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आला. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सामनातून सोनू सूदवर टीका केली होती. पण यानंतर सोशल मीडियावर संजय राऊत यांना ट्रोल देखील करण्यात आलं. राज्यात कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूद हा मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं मोठं काम करतो आहे. याबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतूक देखील होत आहे.
सोशल मीडियावर देखील सोनू सूद चर्चेत राहिला. पण हळूहळू त्याचं नाव राजकारणात आलं. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. तर भाजप नेत्यांनी देखील लगेचच राऊंतावर टीका केली.
सोनू सूद यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला देखील गेला. यावेळी आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. पण त्यानंतर ही सोनू सूद आपलं काम करतो आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
सोनू सूदने म्हटलं की, 'लोकं घरी जात आहे. काही लोकांना बोलू द्या. त्याने काही फरक पडत नाही. लोकं आपल्या घरी पोहोचत आहे हे महत्त्वाचं आहे. लोकं आपल्या राज्यात परतत आहेत. मला महाराष्ट्र सरकारचे पण धन्यवाद मानायचे आहेत.'
सोनू सूदने म्हटलं की, 'संजय राऊत मोठे व्यक्ती आहेत. ते त्यांचं मत आहे. पण एक दिसत सत्य त्यांच्यासमोर ही येईल. आदित्य ठाकरे माझे मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून देखील छान वाटलं. दोघांचे पण धन्यवाद मानतो. त्यांच्यामुळे हे शक्य होतंय.'
'मी अॅक्टर म्हणून खूप व्यस्त आहे. अनेक मोठे सिनेमे समोर आहेत. लोकं जे बोलतात ते खरं नसतं. स्वातंत्र्य आहे त्यांना बोलू द्या. मला राजकारणात कोणताही रस नाही.' असं सोनू सूद याने म्हटलं आहे.