मुंबई : राजकारणात कोण जाणार, असा सुरुवातीला सूर दिसून येत होता. राजकारण म्हणजे गलिच्छ वातावरण. नको रे बाबा राजकारण. मी राजकारणात पाय ठेवणार नाही. राजकारण आपला पिंड नाही, अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या असतील. मात्र, सध्या राजकारणात उच्च शिक्षित लोक येत आहेत. ते निवडणूक लढवत आहेत, ही लोकशाहीसाठी एक चांगली बाब ठरु पाहत आहे. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीचा विचार करता अनेक उच्च शिक्षित लोकांनी निवडणूक लढविली आणि जिंकलीही. राज्यातील सहा डॉक्टरांनी आपला पेशा थोडासा बाजूला ठेवून राजकारणात शिरकाव केला. एक समाजसेवा करण्याच्या चांगल्या हेतूने त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे.
डॉ. अमोल कोल्हे
डॉ. श्रीकांत शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, निवडून आलेल्या सहा डॉक्टर उमेदवारांपैकी चार डॉक्टर तज्ज्ञ आहेत. यात कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे,शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे, बीडमधून दुसऱ्यांदा डॉ. प्रीतम मुंढे, धुळेमधून डॉ. सुभाष भामरे (आधी मंत्री), नंदूरबारमधून पुन्हा एकदा डॉ. हीना गावीत यांचा समावेश आहे.
डॉ. हीना गावित
विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे हे भाजपचे उमेदवार तर शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे आता लोकसभेत जनतेचा आवाज असणार आहेत. ते जनतेचे प्रश्न सोडवतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सहा डॉक्टरांपैकी डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या निवडणुकीतही विजय मिळवला होता.
डॉ. प्रीतम मुंडे
डॉ. सुभाष भामरे
डॉ. सुभाष भामरे कॅन्सर तज्ज्ञ आहेत तर डॉ. सुजय विखे मेंदूविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे अस्थिरोग तज्ज्ञ असून डॉ. प्रीतम मुंडे त्वचाविकार तज्ज्ञ आहेत. तर डॉ. हीना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे एमबीबीएस आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशीही मागणी होत आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत कायदा व्हावा, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे पुनरुज्जीवन करावे, शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवावी, जनतेच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्यावे आदी मागण्या त्यांच्यामाध्यमातून सुटतील अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.
सुजय विखे