Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद

Mumbai News : दोन वर्षांसाठी इथून प्रवास बंद; मुंबईतील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता. पाहा कुठं आहे हा पूल, त्याचा तुमच्यावर कसा होणार परिणाम...    

सायली पाटील | Updated: Mar 25, 2024, 09:24 AM IST
Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद title=
Sion Railway Foot Over Bridge to be closed from 28 march for next two years

Mumbai News : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अनेक प्रयत्नांनंतरही कायम असून आता येत्या काळात ही समस्या आणखी वाढू शकते. भविष्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पूर्णत्वास नेत शहरातील नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नांत असणाऱ्या प्रशासनानं आता शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणारा पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पाडल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीसाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

कुठं आहे हा वर्दळ असणारा पूल? 

मुंबईतील ज्या पुलाचं पाडकाम हाती घेण्यात येणार आहे तो म्हणजे सायन रेल्वे ब्रिज (आरओबी) (Sion Bridge). कैक दिवसांपासून या पुलाच्या पुनर्बांधणीसाठीचे प्रयत्न सुरु असून, आता अखेर या पुलावरील वाहतूक बंद कर्मयात येणार आहे. 27-28 मार्चच्या रात्री हा पूल बंद कण्यात येणार असून, येथील वाहतूक ठप्प होणार आहे. 

यापूर्वी 20 जानेवारी रोजी या पूलाचं पाडकाम हाती घेण्यात येणार होतं. पण, राहुल शेवाळे यांच्या हस्तक्षेपानंतर ही प्रक्रिया लांबणीवर पडली. बोर्डाच्या परीक्षा आणि त्यादरम्यान पाडकाम हाती घेतल्यास विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेता ही तारीख पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, इयत्ता बारावीच्या परीक्षा 19 मार्च आणि दहावीच्या परीक्षा 26 मार्च रोजी संपणार असल्यामुळं 27-28 मार्चला तातडीनं पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : 'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज 

 

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाडकाम केल्यानंतर या पूलाच्या पुनर्बांधणीसाठी साधारण 24 महिने म्हणजेच दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. ज्यामुळं धारावी, एलबीएस रोड आणि पूर्व द्रूतगती मार्गाला जोडणारा हा पूल नसल्यामुळं येत्या काळात वाहतूक चालकांना आणि प्रवाशांना पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा लागणार आहे. 

110 वर्षांहून अधिक जुना असा हा ब्रिटीशकालीन पूल पूर्णपणे पाडल्यानंतर शहरातील या वर्दळीच्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या जोडमार्गांवर प्रचंड गर्दी वाढणार आहे. याशिवाय दैनंदिन स्वरुपात इथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता कुर्ला मार्गानं पूर्व मुक्तमार्ग आणि एलबीएस मार्गाच्या दिशेनं प्रवास करता येणार आहे.