मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली लस कमी प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे. इतर राज्यांचा विचार करता महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस पुरविण्यात आहे. आधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कोरोना लसीची कमी ऑडर केल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रावर टीका केली आहे.
केंद्राकडून कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला नाही तर तीन दिवसानंतर लसीकरण बंद पडेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला होता. त्यानंतर आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पनवेल या ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. साताऱ्यात लस संपली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. “ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त 7.5 लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश 48 लाख, मध्य प्रदेश 40 लाख, गुजरातला 30 लाख, हरियाणाला 24 लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झाले आहे.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम आणि इतर बाबींवर टीका केली होती. त्यामध्ये राज्यात होणाऱ्या लसीकरणापासून ते राज्य सरकारच्या करोनाबाबतच्या एकूण धोरणावर टीका केली होती. त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद निर्माण झाला होता. आता 7.5 लाख लसीचे डोस दिल्यानंतर राजेश टोपे यांनी टीका केली आहे.
राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख आहे. मृतांची संख्या 57 हजार, एकूण बाधितांची संख्या 30 लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त 7.5 लाख लसी का, असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे. सर्व पद्धतीने केंद्राशी समन्वय ठेवला जात आहे. 7 दिवसाला 40 लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला 40 लाख आणि महिन्याला 1 कोटी 60 लाख डोस मिळायला हवेत, असे टोपे म्हणालेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी सुधारणा करण्यास सांगितले आहे. आता त्याची वाट पाहत आहोत, असे टोला टोपे यांनी लगावला.