मुंबई : वन क्षेत्रांवर मानवानं अतिक्रमण केलं आणि मग याचे पडसाद हिंस्र स्वरुपात दिसून येऊ लागले. जिथं वन्य अधिवासातून प्राणी सीमा ओलांडून बाहेर येथ मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करु लागले. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात अशा घटना घडणं ही काही नवी बाब नाही. पण, नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ पाहताना मात्र पायाखालची जमीन सरकत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
बुधवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळत आहे. ज्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही फूटेजमध्ये रेकॉर्डही झाला. मागील तीन दिवसांमध्ये ही दुसरी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. 55 वर्षीय निर्मला देवी सिंह अशी पीडित महिलेची ओळख पटली असून, त्या घराबाहेर बसलेल्या असतानाच मागून बिबट्या आला. तिथं बिबट्या आल्याची चाहूलही त्यांना लागली नाही. पण, व्हिडीओमध्ये त्याच्या डोळ्यांची चमक मात्र स्पष्टपणे दिसत आहे.
अगदी दबक्या पावलांनी बिबट्या आला आणि मागूनच त्यानं या महिलेवर हल्ला केला. तोही असा, की ही महिला त्याच्या एका झेपेतच जमीनीवर कोसळली. पण, त्यानंतर स्वत:ला सावरत या महिलेनं जवळच असणाऱ्या काठीची मदत घेत बिबट्याला घाबरवत पळवून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच ती यशस्वीही ठरली. वेळेवर योग्य पर्याय सुचल्यामुळं मोठ्या धाडसानं या महिलेनं आलेलं संकट पळवून लावलं. या साऱ्यामध्ये त्यांना दुखापतही झाली असून, जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
#Leopard #attacked a 68 year old lady @AareyColony while the lady has sustained injured. @CMOMaharashtra @AUThackeray@ranjeetnature @nikit_surve @MahaForest @AareyForest @SaveMumbaifore1 @LotSatish @kaushal143all pic.twitter.com/auph56PsBY
— Wasim athaniya (@athaniya_vasim) September 29, 2021
@athaniya_vasim नावाच्या युजरनं ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत सदर घटनेची माहिती दिली. पाहता पाहता हा सारा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. वन्य जीवांच्या हद्दीत मानवी अधिवास वाढवल्यामुळं नेमके काय परिणाम उदभवू शकतात याचीच प्रचिती यातून अनुभवायला मिळाली.