एवढ्या ठिकाणी होतं हल्ल्याचं षडयंत्र, गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक माहिती उघड

गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

Updated: Apr 21, 2022, 07:03 PM IST
एवढ्या ठिकाणी होतं हल्ल्याचं षडयंत्र, गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक माहिती उघड title=

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा, कट रचल्याचा आणि पैसे उकळल्याचा गंभीर आरोप सदावर्तेंवर आहे. 

त्यातच जातीय तेढ निर्माण होईस असं चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता सदावर्ते यांच्यासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

तीन ठिकाणी हल्ल्याचं षडयंत्र
संपकरी ST कर्मचाऱ्यांचा आणखी तीन महत्वाच्या ठिकाणी हिंसक आंदोलन करण्याचा डाव होता, अशी माहिती झी २४ तासच्या हाती आलीय.  ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवार यांच्या घराव्यतिरिक्त आणखी 3 ठिकाणी अशाच प्रकारे आंदोलन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र ही तीन ठिकाणं कोणती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं हल्ल्याचं मोठं षडयंत्र उघड झालं आहे.

इमारतीच्या टेरेसवर बैठका
सदावर्तेंच्या घरी गेल्या 6 महिन्यांपासून मॅरेथॉन बैठका होत होत्या आणि या बैठकीला एसटी कर्मचारी गट करुन येत होते. बैठकीमध्ये संपाबाबत चर्चा होत होती अशी माहितीही समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर या निवासस्थानी इमारतीच्या टेरेसवर बैठका होत होत्या अशी पोलिसांची माहिती आहे.

सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांचा ताब्यात
 मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी काल सदावर्ते यांना ताब्यात घेतलं. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोमवारपर्यत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सकल मराठा मोर्चाचे समान्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.