मुंबई : आपण जे चवीने फरसाण खातो ते नेमके कसे बनवले जाते हे आपल्याला माहिते आहे का ? आम्ही एक फरसाण तयार करण्याचा कारखाना दाखवल्यावर आपल्याला नक्कीच धक्क्का बसेल. कारण असाच अत्यंत गलिच्छ वातावरणात एक फरसाण बनवण्याचा कारखाना अंबरनाथ मध्ये सुरू आहे. उंदिर, सरडे, माशांचा घोंघाट, विविध पोत्यांमधील निकृष्ट दर्जाचे चणापीठ अशा पद्धतीने हे फरसाण तयार केले जाते. हा आहे फरसाण तयार करण्याचा कारखाना.
हा कारखाना पाहून आपल्याला नक्कीच धक्क्का बसेल. अशा गलिच्छ कारखान्यात तयात केलेलं फरसाण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंद करून विकले जात आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होवू शकतो. कुठलीही स्वच्छतेची काळजी न घेता पाम तेलात हे पदार्थ तळले जातात. या कारखान्याकडे अन्न व औषध प्रशासन, प्रदुषण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकार्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतील जीआयपी डॅमच्या शेजारील एका प्लॉटवर पत्र्याचा शेड उभारत गलिच्छ ठिकाणी निकृष्ट दर्जाचे शेकडो किलो फरसाण तयार करण्यात येत आहे. हेच फरसाण अंबरनाथ, बदलापूर आणि इतर शहरातील नागरीकांना विकण्यात येत आहे. या कारखान्याच्या मालकाला याबाबत विचारले असता त्याने माझ्या मुलाला सर्व माहित आहे असे उत्तर देत जबाबदारी झटकली. कारखान्यातील कामगारांनी सुद्धा या कारखान्यात उंदीर, सरडे फिरत असतात असे सांगितलंय.
एमआयडीसीच्या नाकाखाली सुरू असलेल्या या कारखान्यांकडे एमआयडीसीचं अधिकारी आणि संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर एमआयडीसी मागील काही काळापासून बेकायदेशीर वस्तुंच्या निर्मितीमुळे सातत्याने चर्चेत आहे. फरसाण कारखान्यातील धक्कादायक वास्तवानं ते पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.