होय, युती झाली आहे! - सामना

शिवसेना मुखपत्र 'सामना'तून युती झाल्याचे जाहीर

Updated: Oct 2, 2019, 11:12 AM IST
होय, युती झाली आहे! - सामना title=
संग्रहित फोटो

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाली. तरीही युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? असा प्रश्न विचारला जात असल्याचे, 'सामना'तून म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून युती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच मुखपत्रातून भाजपा मोठा भाऊ असल्याचेही शिवसेनेने मान्य केले असल्याचे चित्र आहे.

'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी उद्याचा 'सामना' वाचा त्यामधून काय स्पष्ट होईल असे ते म्हणाले होते. त्याप्रमाणे आता केंद्रात आणि राज्यात भाजपाच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सम-समान जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी आता शिवसेनेने भाजपाची ताकद राज्यात वाढली असल्याचे मान्य केल्याचे दिसत आहे.

२८८ जागांची तयारी शिवसेनेने केली असल्याचे सामनातून म्हटले असले, तरी शिवसेनेला १२५च्या जवळपास जागा देण्यात आल्या आहेत. इतर जागा मित्रपक्ष आणि भाजपाने स्वत:कडे खेचल्या आहेत. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात दररोज अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकारण अधिक रंजक होईल असे म्हणण्यास हरकत नाही.