शिवसेना राष्ट्रवादीसमोर सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव ठेवणार?

शिवसेना-भाजप युती तुटणार?

Updated: Nov 10, 2019, 01:29 PM IST
शिवसेना राष्ट्रवादीसमोर सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव ठेवणार? title=

मुंबई : भाजपा सत्ता स्थापनेत अपयशी ठरल्यास शिवसेना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीसमोर प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतल्या विश्वासनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे आता नवं समीकरण जुळताना दिसणार आहे. शिवसेना-भाजपमधील दरी वाढल्यामुळे युती तुटण्याच्या मार्गावर आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष शिघेला पोहोचला आहे. पण आता शिवसेनेने नवा पर्याय शोधल्याचं दिसतं आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे फलक आता मुंबईत झळकले आहेत. कलानगर, बांद्रा या भागात हे फलक लागले आहेत. बदललेल्या समीकरणामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली घडत आहेत. शिवसेना आमदारांची आज द रिट्रीट हॉटेलवर आदित्य ठाकरे हे बैठक घेत आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

काल मध्यरात्रीपासून आदित्य ठाकरे द रिट्रीट रिसॉर्टवर मुक्कामाला आहेत. मध्यरात्री आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या आमदारांशी संवाद साधला. सामनातून संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा नको ही सर्वांचीच भूमिका असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्यांनी भाजपचा उल्लेख हिटलर असा केला आहे. 

काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरला आहेत. राजस्थानात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार आणि नेते हे शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही असल्याचं कळतं आहे. तर भाजपने सरकार स्थापन केल्यास राष्ट्रवादी विरोधात मतदान करेल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

<iframe width="560" height="350" src="
https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>