'राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत'

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतल्या घडामोडींना सध्या वेग आलाय. त्यातच मोहन भागवत यांचं नाव या शर्यतीत मागे पडल्यानंतर शिवसेनेनं आणखी एका नावाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. 

Updated: Jun 16, 2017, 12:03 PM IST
'राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत' title=

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतल्या घडामोडींना सध्या वेग आलाय. त्यातच मोहन भागवत यांचं नाव या शर्यतीत मागे पडल्यानंतर शिवसेनेनं आणखी एका नावाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. 

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं ९१ वर्षीय कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष आणि हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामिनाथन यांच्या नावाला पाठिंबा दर्शवलाय.   


प्रणव मुखर्जी आणि स्वामिनाथन

शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत, असा आपला आग्रह जाहीर केलाय. 

भाजप नेत्यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला आक्षेप असेल तर एम एस स्वामिनाथन यांच्या नावला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. 

रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी, ते याबाबतीत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातंय.

काय म्हटलं राऊत यांनी... 

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून मोहन भागवत यांना पहिली पसंती दिली गेली. परंतु, भाजपचा मोहन भागवत यांच्या नावाला विरोध असेल किंवा अडचणी असतील... तर शिवसेनेचा दुसरा पर्याय आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांचे तारणहार एम एस स्वामिनाथन... स्वामिनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. सध्या देशातील सर्वच शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी आग्रही आहे. त्यामुळे स्वामीनाथन यांनाच राष्ट्रपती केले तर देशातील शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय असेल... अशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे.