Shiv sena Dasara Melava: दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. दरम्यान शिवसेनेत 2 गट झाल्यानंतर छ. शिवाजी पार्क येथे कोणता गट मेळावा घेणार? हा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान यंदा यावर मार्ग निघाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार हे आता स्पष्ट झालंय. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटातील संभाव्य वाद मिटला आहे
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज मागे घेण्यात आलाय, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी एक्सवरून ही माहिती दिलीय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली 50 वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले आहेत. यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा आणि हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचं जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली असं सरवणकरांनी म्हंटलंय.
शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. ठाकरे गटाला सहानुभूतीचं राजकारण करायचं आहे अशी टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या मोतीतलावावरचा डोमकावळा अशी टीका राऊतांनी केली.
ठाकरे सहानुभूतीचे राजकारण करत असल्याचा आरोप दिपक केसरकरांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी हा टोला लगावलाय.भाजपा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजप कार्यालयातच दसरा मेळावा करा असं वक्तव्य नाईकांनी केलंय.