हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे वैफल्यग्रस्त कोण? संजय राऊत यांचा सवाल

संजय राऊत यांनी शाब्दिक तोफ डागली.   

Updated: Dec 20, 2021, 10:18 AM IST
हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे वैफल्यग्रस्त कोण? संजय राऊत यांचा सवाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाब्दिक तोफ डागली. 

'आतापर्यंत सत्य आणि न्याय याचीच गर्जना घुमली आहे. अमित शाह रविवारी पुण्यात आले त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते पूर्णपणे असत्याला धरुन होतं. ते नेमकं खरं काय बोलले हेच आम्हीही शोधत होतो', असं ते म्हणाले. 

आमचं सरकार, आमच्या भूमिका आणि आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेचा मागच्या दोन- अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु असूनही जनता विश्वास ठेवायला तयार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला टोला लगावला. 

राज्यातील काही नेत्यांसोबतच हे वैफल्य  केंद्रातील मंत्र्यांच्या तोंडूनही ऐकू आलं, असं म्हणत अमित शाह वैफल्यग्रस्त असल्याच्या आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. 

केंद्रीय गृहमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आम्हा सगळ्यांना त्यांची दयाही आली आणि आश्चर्यही वाटलं. 

हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडलेला नाही... 
हिंदुत्त्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही आणि सोडणारही नाही. 2014 साली शिवसेनेला दूर करा हे खासगीत सांगणारे कोण होते हे शाह यांनी स्पष्ट करावं असा इशारा राऊतांनी दिला. 

2014 पासून हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण, याचं उत्तर शाह यांनी पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावं... अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. 

राज्यातील सरकार उत्तम सुरु आहे आणि तुमच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला. 

सीबीआय, एनसीबी सारख्या चिलखतांचा वापर करत तुम्ही जे वार करताय त्यापेक्षा समोरुन लढा या शब्दांत मागच्या काही महिन्यांतील परिस्थितीवर त्यांनी कटाक्ष टाकला. 

दरम्यान, रविवारी पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकताना शाह यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा लढवून दाखवा असं केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होतं. मात्र शिवसेनेनं दगा दिला. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यात आम्हाला अजिबात संकोच नाही असा टोला त्यांनी लगावला होता.