मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात आज आणखी तीन जणांचा प्रवेश होत आहे. गेली पन्नास वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचा बुधवारी दुपारी शिवसेनेत प्रवेश होणार आहे. उद्या दुपारी १२.०० वाजता त्या मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. आदिवासी मतदारसंघातही युतीमध्ये प्रवेश करण्यावरून सध्या स्पर्धा असल्याचं दिसून येतंय. मात्र या पक्षप्रवेशांमुळे भाजपा सेनेतील स्थानिक मात्र अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल त्यांचे बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. करमाळ्यात बागल गटाच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. रश्मी बागल दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल आणि माजी आमदार शामल बागल यांच्या कन्या आहेत. तर रश्मी बागल यांना शिवसेनाप्रवेश दिला आणि तिकीट मिळालं तरीही आपण निवडणूक लढवणार असल्याचं सेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी म्हटलंय.