सीतेला एकच अग्नीपरिक्षा द्यावी लागली, शिवसेना अशा अनेक... संजय राऊत यांची प्रतिक्रिया

'भाजपच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्या शिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही'

Updated: Jun 22, 2022, 02:13 PM IST
सीतेला एकच अग्नीपरिक्षा द्यावी लागली, शिवसेना अशा अनेक... संजय राऊत यांची प्रतिक्रिया title=

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आता वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Shinde) यांनी यावर सूचक ट्विट केलं होतं. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु झाली. 

या चर्चेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी सरकार बरखास्त म्हटलं नाही तर विधानसभा बरखास्त असं म्हटलं आणि जी परिस्थिती मला दिसतेय त्यावरुन माझं मत व्यक्त केलं. मी जे मत व्यक्त केलं आहे ते फारसं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आमदारांवर दबाव, पळवापळवी, प्रलोबनं, महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन त्यांच्यावर हल्ले करणं असे प्रकार जे दिसतातय, त्यामुळे या राज्यातील सरकार अस्वस्थ आहेत. उदया परवा किंवा भविष्यात नक्की वळणं घेईल आता कुणी सांगू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

जेव्हा अशी  परिस्थिती निर्माण होते आणि राज्यांमध्ये तेव्हा साधारण तिथली विधानसभा बरखास्त करुन पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याचा एक मार्ग स्विकारला जातो, हे मी माझं मत व्यक्त केलं आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

मविआ एकसंध आहेत, आमचे काही आमदार बाहेर आहेत, त्यातले एक आमदार नागपूरमध्ये परतले आहेत. त्यांनी जे सांगितलं आहेत तो सर्व प्रकार भयंकर आहे. जोपर्यंत सर्व आमदार मुंबईला परत येत नाहीत तोपर्यंत कोणतंही मत व्यक्त करणं बरोबर नाही, पण भाजपच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्या शिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही. 

पण या प्रसंगातूनही शिवसेना बाहेर पडेल, सीतेला एकच अग्नीपरिक्षा द्यावी लागली, शिवसेना अशा अनेक अग्नीपरिक्षा वारंवार सामोरं जावं लागलं आहे. निष्ठेच्या परिक्षेत स्वत: ला शिवसैनिक म्हणवून घेणारे किती पास होतात हे भविष्यात स्पष्ट होईल.

ज्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन निष्ठेच्या आणाभाका घेतल्या होत्या, आणि कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्र दोह्यांना मदत करणार नाही अशा आणाभाक्या ज्यांनी घेतल्या त्यांची अग्नीपरीक्षा आता सुरु झालेली आहे. भविष्यात स्पष्ट होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.