महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षांची ओळख 'मते कापणारी मंडळी' एवढीच शिल्लक राहिलेय- राऊत

बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात. 

Updated: Sep 20, 2020, 09:07 AM IST
महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षांची ओळख 'मते कापणारी मंडळी' एवढीच शिल्लक राहिलेय- राऊत title=

मुंबई: राज्यातील आंबेडकरवादी पक्षांनी स्वत:चे इतके अध:पतन आणि हसू करून घेतले आहे की, 'निवडणुकीत मते कापणारी मंडळी' हीच त्यांची ओळख झाली आहे, जनतेचे तसे मत बनले आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिचे समर्थन करणाऱ्या रामदास आठवले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रात राजकीय सूर्य उजाडत नाही. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवले. पण महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वत:चे इतके अध:पतन आणि हसू करून घेतले आहे की, 'निवडणुकीत मते कापणारी मंडळी' हीच त्यांची ओळख झाली आहे, जनतेचे तसे मत बनले आहे. 

माझ्या शिष्टाईमुळे शिवसेना आणि कंगनामधील वाद मिटला- आठवले
 
बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात. आंबेडकर हे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाऊन स्थिरावले त्यास कारणे आहेत. इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्या कंगना नावाच्या नटीच्या 'झिंदाबाद'च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस 'पाकिस्तान' म्हणणाऱ्या नटीच्या स्वागतास आंबेडकरी विचारांचा पक्ष पोहोचतो हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. असे वैचारिक द्रोह काशीराम यांनी केले नाहीत व मायावती यांनाही ते करता आले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना देवाप्रमाणे पावले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता रिपाई आणि इतर आंबेडकरवादी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी सोहळ्याला राज्य सरकारने आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना आमंत्रित न केल्यामुळे संबंधितांमध्ये रोष निर्माण झाला होता. मात्र, आता संजय राऊत यांच्या बोचऱ्या टीकेमुळे यामध्ये आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.