'तुम्ही कोणतं सरकार निवडणार भांडण लावणारं, की चूल पेटवणारं' आदित्य ठाकरेंचा सवाल

'अनेकांनी वेगवेगळे रंग हाती घेतले' आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

Updated: May 14, 2022, 08:14 PM IST
'तुम्ही कोणतं सरकार निवडणार भांडण लावणारं, की चूल पेटवणारं' आदित्य ठाकरेंचा सवाल title=

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची हायव्होल्टेज सभा बीकेसीत पार पडत आहे. या सभेतलं आणखी एक वेगळेपण म्हणजे या सभेत आदित्य ठाकरे (Adity Thackeray) यांनीही भाषण केलं. आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जनसागरासमोर काय बोलणार? याची उत्सुकता शिवसैनिकांच्या मनात होती.

शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार असल्याने शिवसैनिकांसाठी हा क्षण ऐतिहासिक होता.

आदित्य ठाकरेंचं भाषण
आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रभर दौरे केले. दोन वर्षात कोविड काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचं कौतुक संपूर्ण जगात झालं.

8 मार्च 2020 रोजी अजित पवार यांनी बजेट सादर केलं. त्यानंतर कोविडचा काळ आला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सूचना करुन बीकेसीत कोविड हॉस्पीटल उभं केलं. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी टीव्हीवरुन सूचना केल्या. लॉकडाऊनचा कोणता टप्पा आहे, काय उघडतोय, काय बंद करतोय याची माहिती दिली. त्यावेळी असं वाटायचं नाही की मुख्यमंत्री दम देतयात, असं वाटायचं आपल्या घरातील वडिलधारे माणूस आपल्याला सांगतोय की काळजी घ्यायची, याला म्हणतात मुख्यमंत्री. 

उद्धव ठाकरे आपल्या हक्काचे मुख्यमंत्री आहेत. अनेक वर्ष वाट पाहतो होतो की शिवसेनेचा असेल. आपल्या सरकारला अडीच वर्ष होत आलीत. देशभरात टॉप थ्रीमध्ये आपले मुख्यमंत्री आले आहेत. 

कोविड काळात कुठेही आम्ही कुठेही थांबलो नाही. पण त्याचबरोबर आपली विकास कामंही थांबली नाहीत, मेट्रोची कामं, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई-नागपूर महामार्ग अशी अनेक कामं मार्गी लावत आहोत.

महागाईचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत,  समाजा-समाजात भांडणं लावली जात आहेत, अनेकांनी वेगवेगळे रंग हाती घेतले आहेत. तुम्ही कुठचं सरकार निवडणार एक भांडण लावणार सरकार आहे आणि एक चूल पेटवणारं सरकार आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

आपलं ब्रिद वाक्य आहे हृदयात राम आणि हाताला काम, कारण जी वचनं आपण देतो ती पूर्ण करतो, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.