कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन आता ठाण्यातून सुसाट धावणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला तब्बल चार वेळा बगल देण्यात आली होती. तर डिसेंबर महिन्यात हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने दप्तरी दाखल केला होता. मात्र बुधवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बुलेट ट्रेनला लागणाऱ्या जागा संपादनाच्या वेळी दिव्यात ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ येथील सर्व्हे क्र ६७/ब/५ हा भूखंड हवा आहे. या भूखंडाचं क्षेत्रफळ 3849.00 चौरस मीटर असून मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याखालील क्षेत्राचा मोबदला आकारून सदरची जागा हि नेशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशनसाठी (बुलेट ट्रेन) वापरात आणण्याची अनुमती देण्याचा विषय आणि त्या भूखंडाचा मोबदला निश्चित करण्याबाबत प्रस्तावाला मंजुरीसाठी महासभेत विषय चर्चेला होता. अखेर आज झालेल्या महासभेत चर्चेला बुलेट ट्रेन भूखंड मोबदल्याला मंजुरी प्रस्ताव मंजुरी मिळाली आहे.
बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ सोबतच डावले, पडले, माथर्डी, देसाई, आगासन आणि बेटावडे या गावांमधील जमिनीचा मोबदला हा गावनिहाय दर निश्चित करण्यात आलेला आहे. तर महापालिकेच्या जागेचा मोबदला निश्चित करून त्या जागेच्या सातबारावर नेशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन(बुलेट ट्रेन) कंपनीचं नाव लावण्यासाठी ठाणे पालिकेच्या महासभेची मंजुरी आवश्यक होती.
बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाच्या सर्व्हेच्या वेळी दिव्यातील ग्रामस्थांनी सर्व्हेला कडाडून विरोध केला होता. तर यापूर्वी चारवेळा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा प्रस्ताव ठाणे पालिकेने लांबणीवर टाकलेला होता. तर एकदा दप्तरी दाखल करण्यात आला होता. अखेर महासभेत बुलेट ट्रेनला आवश्यक असलेल्या पालिकेच्या भूखंडाच्या मोबदल्याच्या निश्चितीचा प्रस्ताव पटलावर येताच चर्चेविना मंजूर करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेन ओळखला जातो. मुंबई ते अहमदाबाद असा या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात ठाणे पालिकेच्या हद्दीतील असलेल्या दिवा-शीळ भागातील 7 गावाचा समावेश असून या भागातील म्हातार्डी इथं बुलेट ट्रेनचं प्रस्तावित स्टेशन आहे. त्यामुळे आता बुलेट ट्रेन धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.