'पर्युषण पर्वात जैन मंदिराबाहेर मांस शिजवणाऱ्यांना धडा शिकवा'

जैन समाजाचा अपमान करणाऱ्यांना मतपेटीच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्या.

Updated: Apr 3, 2019, 11:05 AM IST
'पर्युषण पर्वात जैन मंदिराबाहेर मांस शिजवणाऱ्यांना धडा शिकवा' title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मुंबईत 'जैन कार्ड' बाहेर काढले आहे. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांची मंगळवारी झवेरी बाजार परिसरात सभा झाली. या सभेला स्थानिक व्यापारी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. तेव्हा मिलिंद देवरा यांनी शिवसेना पक्ष नेहमीच जैन समुदायासारख्या अल्पसंख्याकांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले. काही वर्षांपूर्वी पर्युषण पर्वाच्या काळात शिवसेनेने काय केले, हे सगळ्यांना आठवून पाहा. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवतेला अहिंसेची शिकवण दिली. मात्र, शिवसेनेने पर्युषण पर्वाच्या काळात जैन मंदिरांच्या बाहेर मांस शिजवले. अशा लोकांना तुम्ही आगामी निवडणुकीत धडा शिकवायला पाहिजे. व्यापारी बांधव मोदीजींच्या नावावर युतीलाच मत देईल, असा शिवसेनेचा समज आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते जेव्हा प्रचाराला येतील तेव्हा त्यांना याबद्दल जाब विचारा. मात्र, भगवान महावीर आणि जैन समाजाचा अपमान करणाऱ्यांना मतपेटीच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्या, असे आवाहन मिलिंद देवरा यांनी व्यापाऱ्यांना केले. 

मिलिंद देवरा यांच्या या वक्तव्यामुळे दक्षिण मुंबईत मराठी विरुद्ध जैन असा वाद रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईच्या विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. मात्र, प्रस्थापितविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी) आणि जैन मतांचे धुव्रीकरण या दोन गोष्टींचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

अलीकडे पर्युषण पर्वाच्या काळात मुंबई आणि आसपासच्या काळात मांसबंदीचा मुद्दा गाजताना दिसला आहे. काही वर्षांपूर्वी भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्तारूढ भाजपने पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिकेतही अशाचप्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी तीव्र विरोध करत हा प्रस्ताव हाणून पाडला होता.