मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन आठवड्यांहून जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधली कोंडी अजूनही फुटू शकलेली नाही. चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना भाजपपैकी कोणीच पुढाकार घेतलेला नाही.
सत्ता स्थापनेच्या कालावधीचा अखेरचा दिवस उजाडला तरी काही भाजप आणि शिवसेनेत एकमत झालं नाही. उलट दोन्ही पक्षांतील संबधांमध्ये अधिकच कटुता निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळालं. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर खोटारडेपणाचा आरोप केला आणि सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला.
आता जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर गेले कित्येक वर्ष युतीत असलेले भाजप आणि शिवसेना आता मात्र एकमेकांपासून दुरावले आहेत.
शिवसेना-भाजपाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी चक्क न भांडण्याचा सल्ला दिला आहे. जुने मित्र आहेत असं सांगत असतील तर त्यांनी भांडू नये असं पवार म्हणाले. तसंच जनतेनं विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल आपल्या पक्षाला दिल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.