मुंबई मेट्रोच्या कामांसाठी नागपूरचे ठेकेदार मागवले; शिवसेनेचा फडणवीसांवर आरोप

 मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. 

Updated: Oct 15, 2018, 08:59 AM IST
मुंबई मेट्रोच्या कामांसाठी नागपूरचे ठेकेदार मागवले; शिवसेनेचा फडणवीसांवर आरोप title=

मुंबई: मुंबई शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा व पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अकार्यक्षम कारभारावर बोट ठेवले आहे.

पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यानेच मुंबई आतापर्यंत सुरक्षित राहिली होती. पण गेल्या दोन-चार वर्षांत मुंबईची जास्त वाट लागली आहे. सर्वच बाबतीत मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व वाट लावण्यासाठीच. पंतप्रधान मोदींच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आमच्या पोलिसांना समजते, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे 'बॉम्ब' ठेवल्याची माहिती मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घालणार आहेत हे पोलिसांना कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबईत सध्या 'मेट्रो'ची वारेमाप कामे काढली आहेत. हे सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांचा दावा आहे. त्यांना वरून आशीर्वाद असल्याने संपूर्ण मुंबईत त्यांचा हवा तसा उत्पात सुरू असल्याचे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.