शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Updated: Oct 30, 2019, 08:08 PM IST
शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले title=

मुंबई : मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा लागला असताना राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांना पेव फुटले आहे भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भाजप सुरुवातीला एकटे सरकार स्थापन करेल, त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेने फार ताणून धरू नये, असा राजकीय सल्ला आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणायचे, कुठले चमकावायचे ती ताकत शिवसेनेमध्ये आहे, असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत आरपारची लढाई दिसून येत आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास त्यावर पक्षश्रेष्ठी आणि मित्रपक्षासमोर ठेवून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. ते कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तर दुसरीकडे शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता एकमेकांना इशारेबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेकडे अन्य पर्याय आहेत पण ते आम्ही वापरणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तर पर्याय भाजपकडेही आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले आहे. त्यामुळे युतीमधील वाद मिटण्याचा आणि तणाव निवळण्याचा नाव घेत नाही. त्याचवेळी शिवसेनेनं समंजसपणा दाखवावा तसंच टीका करताना आपली जागा ओळखावी, असा सल्ला संजय राऊत यांना भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिला आहे.

CMनी सत्तेत अर्धा वाटा देण्याचे केले होते मान्य - संजय राऊत

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 'सामना'चा अग्रलेख डॅमेज कंट्रोल नसल्याचेही राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेला अजूनही उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केल्यास भाजप चर्चेसाठी तयार आहे, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपद पाच वर्षे स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचं मत असं मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपा आणि शिवसेनेतील प्रेम कायम असून राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल असंही ते म्हणाले.