"आमदार मुंबईत येतील तेव्हा ते...", शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा

राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेनं बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते.

Updated: Jun 23, 2022, 02:58 PM IST
"आमदार मुंबईत येतील तेव्हा ते...", शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा title=

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेनं बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते. गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरु आहे. रोज कुणीतरी आमदार इकडून तिकडे गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेमके कोणते आणि किती आमदार कुणाबरोबर आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. 17 आमदारांच्या उपस्थितीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती आरोप केले. 

"आज आपल्यासमोर शिवसेनेचे दोन आमदार आहेत. मराठवाड्यातले कैलास पाटील आणि विदर्भातले नितीन देशमुख आमच्याबरोबर आहेत. यातले एकजण सूरतहून आलेत तर दुसरे गुवाहाटीवरुन आले आहेत. इथे येताना त्यांना संघर्ष करावा लागला. ही संपूर्ण कहाणी थरारक आहे. शिवसेनेचा आमदारांना अपहरण आणि फसवून भाजपाने नेलं आहे. गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.", असा आरोप संजय राऊत यांनी केला.

"तिथली स्थिती सांगण्यासाठी कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना तुमच्या समोर आणलं आहे. देशातलं राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं हे दिसंतय. शिंदे गटातल्या 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी किती व्हिडीओ पाठवले तरी ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेनेचे असतील. या सर्वांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही विजयी होऊ.", असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.

"त्या आमदारांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं. त्यांची जी मागणी आहे, ती अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल. पण त्यांनी आधी मुंबई येण्याची हिम्मत दाखवावी. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसेना सोडणार नसल्याचं सांगताहेत. आमची भूमिका सध्याच्या सरकारबाबत आहे. त्या महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिम्मत दाखवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर या आणि भूमिका मांडा. नक्कीच तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या.", असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.