कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...

Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2024, 07:57 AM IST
कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण... title=
Shiv Sena MLA Disqualification Hearing aditya thackeray rutuja latke remains safe

Shiv Sena MLA Disqualification Hearing : राज्यातील सत्तानाट्यामध्ये दर दिवशी एक नवा अंक सादर होत असतानाच याचा सर्वात महत्त्वाचा अंक बुधवारी सादर होणार असून, आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अखेर सादर करणार आहेत. आता निकाल कोणच्या बाजूनं लागणार, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचं नेमकं भवितव्य काय असणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, भविष्याच्या दृष्टीनं दोन्ही गटांनी संभाव्य शक्यतांच्या धर्तीवर पुढील तयारीही करण्यात सुरुवात केली असावी. या साऱ्यामध्ये मात्र ठाकरे गटाच्या दोन आमदारांच्या पदावर फारसा परिणाम होणार नाहीये. 

थोडक्यात निकाल कोणाच्याही बाजूनं लागला तरीही या आमदारांची आमदारकी मात्र कायम राहणार आहे.  ठाकरे गटाच्या दोन आमदारांवर अपात्रता निकालाचा कोणताही परिणाम होणार नसणारे हे दोन आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके. शिंदे गटाकडून आमदार अपात्रता याचिका दाखल करतेवेळी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं होतं.

हेसुद्धा पाहा : MLA Disqualification Hearing LIVE: आज फैसला! शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल कोणाच्या पारड्यात?  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्यामुळं त्यांच्यावर अपात्रता कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे आमदार ऋतुजा लटके या देखील आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूरच असणार आहेत. मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत, त्यामुळं या निकालाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. 

आमदार अपात्रता निकालापूर्वी वाढल्या राजकीय हालचाली 

दरम्यान, इथं आमदार अपात्रता याचिकांवरील निकाल येण्यापूर्वी राज्यातील राजकारणा हालचाली वाढल्या असून, मोठे नेते त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 'महायुती सरकार नियमाने स्थापन झालं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळं मेरिटप्रमाणे आमदार अपात्रता निकाल लागावा' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. तर, योग्य कायदेशीर अपेक्षित निर्णयच अध्यक्ष घेतील असं म्हणताना आमची बाजू भक्कम असून असल्यानं अध्यक्ष आम्हाला न्याय देतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

दरम्यान, मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहुल नार्वेकर यांनी त्यांची भेट घेतली. पण, मतदारसंघातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली असं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलं. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक पूर्वनियोजित होती, जनतेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काय? असा थेट सवाल यावेळी त्यांनी केला.