दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात तुतीकोरीनची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर तात्काळ नाणारची भूसंपादन अधिसूचना रद्द करा, असा इशारा शिवसेनेच्या मंत्र्यांनी पत्र लिहून दिला आहे. यापूर्वीही शिवसेनेनं नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप ही अधिसूचना रद्द केलेली नाही, त्यामुळे शिवसेना मंत्र्यांनी परत पत्र लिहून अधिसूचना रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, नाणार भूमसंपादनाची अधिसूचना सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. तुतीकोरीनसारखी दुर्दैवी परिस्थिती नाणारमध्ये उद्भवू नये, म्हणून वेळीच उपाय करावेत, अशी भूमिका घेत शिवसेनेने पत्राद्वारे मागणी केली आहे.अधिसूचना रद्द करण्याच्या उद्योग विभागाच्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी द्यावी, अशी विनंतीवजा मागणी शिवसेनेने पत्रात केली आहे.
तामिळनाडूमधील तुतीकोरीनमधला, स्टरलाईट कंपनीचा, खनिजापासून तांबं मिळवण्याचा उद्योग, तामिळनाडू सरकारनं बंद केला आहे. सुमारे ७ हजार माणसं बेकार झाली आहेत. उद्योगानं होणाऱ्या प्रदुषणाचा त्रास सहन करणाऱ्या लोकांनी केलेल्या आंदोलनात १३ माणसांना जीव गमवावा लागला आहे, शेकडो जखमी झाली आहेत.