मुंबई : दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून भाजपविरोधी रणनिती संदर्भात पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेय.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर काय भूमिका घ्यायची याबाबत शिवसेनेची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनाभवानात ही बैठक पार पडली.
या बैठकीला आदित्य ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई उपस्थित होते. याखेरीज पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखही बैठकीला उपस्थित होते. नारायण राणेंचा मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरुन शिवसेना नाराज आहे.
फडणवीस सरकारची त्रिवर्षपूर्ती आणि मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातेय.
शेतकऱ्यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या सद्यस्थितीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आलाय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची चर्चा झाल्याची माहिती झालेय.