मुंबई: मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेकदा जाहीरपणे टीका करणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला. ते बॉलीवूडच्या 'पलटण' या चित्रपटातील एका गाण्याच्या लाँचिंग सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.
यावेळी त्यांनी संगीतकार अनु मलिक यांची मजेशीर शब्दांत फिरकी घेतली. अनु मलिक हे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडू शकतात, त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. त्यांनी राजकारणात येण्यास हरकत नाही, अशी मिष्किल टिप्पणी यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.
दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्या विनंतीला मान देऊन मी याठिकाणी आलो. त्यांचे निमंत्रण मी टाळू शकत नाही. आमचे नाते खास असल्यामुळे मी तुमच्याशी 'दिल की बात' करत आहे. 'मन की बात', मला करता येणार नाही. कारण, त्याचे पेटंट दुसऱ्या कोणाकडे तरी आहे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाला रोख साहजिकच नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शत्रुघ्न सिन्हांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.