मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असून उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मात्र राऊतांच्या नावासाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाचे नाव पुढे येणार याचीच चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेने विधीमंडळ नेता म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.
उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सरकार चालवणे सोपे जाईल, असे पवारांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे तयार होत नसतील तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नावाला पवार यांची पसंती असल्याचे कळते आहे.
संजय राऊत यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीशी चांगले संबंध असल्याने समन्वय राहील, असे पवारांचं म्हणणे आहे. पण संजय राऊत यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊतांपेक्षाही बरेच वरिष्ठ नेते शिवसेनेत आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या नावाला उद्धव ठाकरे कितपत ग्रीन सिग्नल देतील, याबद्दल साशंकता आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. एनडीएतून बाहेर काढले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत केला. दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ५०-५० च्या फॉर्म्युलाबाबत खोटे विधान केले, असे उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. तर आमदारांनी पुढील मुख्यमंत्री कोण असावा, यावरही भाष्य केले. शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांची उद्धव ठाकरेंच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हे उद्धव ठाकरेच घेतील आणि सर्व सेनेचे आमदार हे मुंबईतच राहणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर सेना आमदारांनी ही प्रतिक्रिया दिली.