'आईच्या अस्थी कुरिअरनं पाठवून द्या'

त्यांच्या अस्थी तुम्ही कधी स्वीकारणार?

Updated: Aug 24, 2018, 10:24 PM IST
'आईच्या अस्थी कुरिअरनं पाठवून द्या' title=

मुंबई: हल्लीच्या जगात आपुलकी आणि संवेदनशीलता हरवत चालली आहे, हे वाक्य हल्ली सर्रास कानावर पडते. एरवी अगदी साध्या प्रसंगातही हे वाक्य उच्चारले जाते. प्रत्यक्षात तशी वेळ ओढावेलही, अशी कल्पनाही अनेकांना नसते. मात्र, पालघरमधील एका घटनेमुळे माणसांतील आपुलकी व संवेदनशीलता खरोखरच संपली आहे का, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.  

पालघरमध्ये वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने पोटच्या मुलीने व्हिडीओ कॉलिंगवरून आईचे अंत्यदर्शन घेतले. एवढेच नव्हे तर आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा, असेही सांगितले. 

डोंगरी भागातील मनोर हायस्कूलजवळ राहणाऱ्या निरीबाई धीरज पटेल (६५) या पारशी महिलेचे बुधवारी निधन झाले. अहमदाबाद येथे राहत असलेली त्यांची एकुलती एक मुलगी व जावयाशी गावकऱ्यांनी संपर्क साधला. 

 
आपण कधी आणि किती वाजेपर्यंत येणार आहात, अशी विचारणा केल्यावर आम्हाला येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मग अंत्यदर्शन कसे घेणार, त्यासाठी कितीवेळ थांबायचे? या प्रश्नावर व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला त्यांचे दर्शन घडवा, असे त्यांची मुलगी व जावयाने सांगितले. त्यांच्या अस्थी तुम्ही कधी स्वीकारणार, यावर तुम्ही त्या कुरिअरने पाठवा, असे उत्तर मिळाले. त्यामुळे ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्याचे ठरविले. पारशी समाजाची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी हिंदू पद्धतीने अंत्यविधी केले.