...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं... पण, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही... यानिमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढलाय.

Updated: Apr 16, 2018, 08:31 PM IST
...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट! title=

अमित जोशी / दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं... पण, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही... यानिमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढलाय.

भाजप वाघाला गोंजारणार?

वाघाला गोंजारणं म्हणा, मतांसाठीची बेगमी म्हणा किंवा अजून काही... भाजपची ही युतीसाठीची अगतिकता आहे. २०१४ मधल्या मोदी लाटेसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. त्यामुळे भाजपला आता मित्र महत्त्वाचे वाटायला लागलेत. म्हणूनच युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्यासाठी मुनगंटीवारांनी १६ एप्रिलचा मुहूर्त ठरवला होता. मुनगंटीवारांनी मातोश्रीवर फोन केला पण, उद्धव ठाकरेंनी भेटीची वेळ नाकारली. स्वबळावर लढण्याबद्दल शिवसेना ठाम आहे.

सेनेत रोष

गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजपमधला तणाव वाढलाय. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांची हत्या आणि त्यावरुन शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, यावरुन शिवसेनेत रोष आहे. त्यातच नाणारचा करार झाल्यानं शिवसेना संतप्त आहे. आमदारांना निधी न मिळण्याच्या कारणावरुन उद्धव ठाकरे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दोन तास ताटकळत ठेवलं आणि एवढं करुनही भेट नाकारली. याचाच वचपा आता शिवसेनेनं काढलाय. 

दुसरीकडे भाजपला जास्तीत जास्त बदनाम करावं, जेरीस आणावं आणि मातोश्रीसमोर गुडघे टेकायला लावावेत, अशी शिवसेनेची रणनिती आहे. आता सध्याच्या परिस्थितीत तरी मातोश्रीवरुन अपॉईण्टमेंटची वेळ कधी मिळते, याची वाट पाहण्यावाचून भाजपकडे पर्याय नाही.