BMC मध्ये जॉब करणारे शिपाई राहतात सरकारी बंगल्यात; अधिकाऱ्यांचा प्रताप

मुंबई महापालिकेतील अनेक क्लास वन दर्जाचे अधिकारी शासकीय निवासस्थान मिळावे म्हणून वर्षानुवर्षे वाट पाहत असताना. दुसरीकडे एका साध्या शिपायाला मात्र चक्क बंगला मिळाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. 

Updated: Dec 4, 2022, 05:24 PM IST
BMC मध्ये जॉब करणारे शिपाई राहतात सरकारी बंगल्यात; अधिकाऱ्यांचा प्रताप title=

कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई  : पत्नींच्या नावे कंपनी स्थापन करून मुंबई महापालिकेतील( Mumbai Municipal Corporation ) कोवीडची(COVID) कामे मिळवणा-या शिपायाला राहण्यासाठी पालिका अधिका-यांनी चक्क शासकीय बंगलाही दिल्याचे समोर आले आहे. तसंच दोन शिपायांच्या कंपन्यांना कंत्राटे दिल्याप्रकरणी त्यांना निलंबित केले असले तरी यातील वरिष्ठ अभियंत्यांना मात्र पाठीशा घातलं जात असल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

मुंबई महापालिकेतील अनेक क्लास वन दर्जाचे अधिकारी शासकीय निवासस्थान मिळावे म्हणून वर्षानुवर्षे वाट पाहत असताना. दुसरीकडे एका साध्या शिपायाला मात्र चक्क बंगला मिळाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अर्जून नराळे असं या शिपायाचे नाव असून नाना चौकातील डी विभागाच्या घनकचरा विभागात तो कामाला होता.  पत्नींच्या नावे कंपन्या स्थापन करून कोरोना काळात मुंबई महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे लाटणा-या दोन शिपायांपैकी तो एक शिपाई आहे.

अर्जून नराळेने पत्नी अपर्णाच्या नावे श्री एंटरप्रायजेस कंपनी स्थापन करून दीड वर्षात एक कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली होती. तर मेंटेनन्स विभागातील शिपाई रत्नेश भोसलेने पत्नी रियाच्या नावे आर आर एंटरप्रायजेस कंपनी स्थापन करून 65 लाख रुपयांची कामे घेतली होती. 

याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर या दोघांना सेवेतून निलंबित केले असले तरी त्यांच्यावर अजूनही पालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच नियम धाब्यावर बसवत या दोघांना मदत करणा-या पालिकेच्या डी विभागातील दहा अभियंत्यांचीही खात्यांर्गत चौकशीही अजून सुरू केलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून समोर आलेले आहे. परंतु केवळ दोन शिपायांना निलंबित करून वरिष्ठ अधिका-यांना मात्र वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.