"...तर पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता"; पंडित नेहरुंवरील आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Ranjit Savarkar allegations : नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि 12 वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली, असा आरोप रणजीत सावरकरांनी केलाय. त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे

Updated: Nov 19, 2022, 10:38 AM IST
"...तर पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता";  पंडित नेहरुंवरील आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया title=

Ranjit Savarkar allegations : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (bharat jodo yatra) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर भाजपने (BJP) राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलने केली आहेत. मनसेनेही या आंदोलनात उडी घेत राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे. तर दुसरीकडे रणजीत सावरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि 12 वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली, असा आरोप रणजीत सावरकरांनी केला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले रणजीत सावरकर?

"पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाच नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली," असा आरोप रणजीत सावरकर यांनी केलाय.

'एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केली...' रणजीत सावरकरांचा खळबळजनक आरोप...

आम्ही सर्व जण सावरकरांसाठी इथे वकिली करत आहोत - संजय राऊत

"पंडित नेहरु यांनी काय केले हे देश पाहतोय. पंडित नेहरु, महात्मा गांधी, मौलाना आझाद, वीर सावरकर या सगळ्यांचे योगदान आहे. सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून नेहरुंवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वतःला सावरकारंचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला हवे. ही आपली परंपरा नाही. आम्ही सर्व जण सावरकरांसाठी इथे वकिली करत आहोत. पण या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि हा देश घडवण्यात पंडित नेहरूंचे मोठे योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते तर त्या दिशेने देश नेण्याचे काम पंडित नेहरुंनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. याबद्दल देश नेहरुंचा ऋणी आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.