बहुतेक अजित पवारही परत येतील - संजय राऊत

अजित पवारांना ब्लॅकमेल केलं जातंय 

Updated: Nov 23, 2019, 02:20 PM IST
बहुतेक अजित पवारही परत येतील - संजय राऊत  title=

मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अजित पवारांच्या आणि राष्ट्रवादी आमदारांच्या जाण्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय राऊतांनी, 'बहुतेक अजित पवार पुन्हा येतील' असं वक्तव्य केलं. यामुळे पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहायला मिळणार की काय? असा संभ्रम निर्माण होत आहे. 

'अजित पवारांसोबत सकाळी 8 आमदार होते. त्यातील 5 आमदार पुन्हा परत आले आहेत. आमदारांच जवळपास किन्डॅपिंगच करून त्यांना नेण्यात आलं होतं. धनंजय मुंडे यांचा देखील संपर्क झाला आहे. बहुतेक अजित पवार देखील परत येतील',अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. अजित पवारांबाबत संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य या राजकीय नाट्याला वेगळं वळणं देतंय का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 

तसेच 'पवार साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचचं म्हणजे महाविकासआघाडीचच सरकार बनणार. तसेच महाराष्ट्रात अंधारात फक्त पाप होतं. सकाळी 7 वाजता जे सरकार बनवलं त्याचं पुढे काय?' असं देखील संजय राऊत म्हणाले. तसेच 'अजित पवारांना कोणत्या प्रकारे ब्लॅकमेल केलंय यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. त्या ब्लॅकमेलची सुरूवात कुठून आणि कुणाकडून झाली याचा सर्व खुलासा 'सामना'मध्ये होईल असं संजय राऊत म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांना उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख बनवलं आहे का? त्यांनी आपल्या पक्षाचं बघावं.आपल्या पक्षाला वाचवा. दरोडा घालण्याची जी गोष्ट केली त्यासाठी सांभाळून राहा. हा महाराष्ट्र आहे, अशा कठोर शब्दात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे 19 आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले चंद्रकांत पाटलांसह 35 आमच्या संपर्कात आहेत, असं बोलून तेथून निघून गेले.