मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. अहमद पटेल यांनी यावेळी भाजपवर टीका केली. 'आज सकाळी बँड-बाजाशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. विधीवत जे झालं पाहिजे होतं, ते नाही झालं. एका नेत्याने एक यादी देऊन शपथविधी झाला. काही ना काही चुकीचं झालं आहे. संविधानाची अवहेलना करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने बोलणी सुरु होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु होती. उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना फोन केल्यानंतर आम्ही लगेचच महाराष्ट्रात आलो. चर्चा झाली. आज आमची पुन्हा बैठक होणार होती. पण सकाळी जे झालं त्यांचा आम्ही निषेध करतो.
'आमच्याकडून कोणताही उशीर नाही झाला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोन आल्यानंतर लगेचच आम्ही येथे आलो. राष्ट्रवादीचा एक नेता बाहेर पडल्या यामुळे हे सगळं झालं. आम्ही एकत्र आहोत. विश्वासदर्शक ठरावात आम्ही त्यांना पराभूत करु. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आमची पत्रकार परिषद ठरली होती. आधी बैठक असल्यामुळे आम्ही शिवसेना-राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत येऊ शकलो नाही. आमचे सगळे आमदार सोबत आहेत. आमचं सरकार बनेल.'
'तिन्ही पक्ष मिळून विश्वासदर्शक ठरावात याला विरोध करु. आमचे आमदार फुटणार नाहीत. पण तरी आम्ही काळजी घेऊ. शिवसेनेसोबत कोणत्याच मुद्द्यावर मतभेद नाहीत. अजित पवार यांची ही हरकत हैराण करणारी होती.'
'उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शरद पवारांनी आधीच याबाबत घोषणा केली आहे.' असं देखील काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.