मुंबई : congress leadership issue : कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस (congress) पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचे सहकार्य आहे, असे असताना गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Shiv Sena Leader Sanjay raut on congress leadership issue )
गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा प्रश्न सुटलेला नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद घेतले. मात्र, अजूनही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यावरुन काँग्रेसवर टीका होत आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी काँग्रेसमधील जी-23 गटाकडून मागणी करण्यात येत आहे. आता संजय राऊत यांनी काँग्रेसला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाविषयी आपली भूमिका देखील स्पष्ट केली.
काँग्रेसला अध्यक्ष हवा की नको हा काँग्रेसचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केले आहे. असे असताना पक्षाला अध्यक्ष नसणे याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. हे योग्य वाटत नाही, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा भाजपसारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असे राऊत म्हणाले.