दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप सुरुच; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

आज दुसऱ्या दिवशी देखील डॉक्टरांचा संप सुरुच आहे. 

Updated: Oct 2, 2021, 09:42 AM IST
दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप सुरुच; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करणार title=

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबरपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला. निवासी डॉक्टरांकडून हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टराच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप पुकारण्याचं पाऊल उचललं आहे. तर आज दुसऱ्या दिवशी देखील डॉक्टरांचा संप सुरुच आहे. डॉक्टरांच्या या संपाचे परिणाम रूग्णसेवेवर होताना दिसून येतायत.

दरम्यान काल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने निवासी डॉक्टरांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचीही माहिती आहे. मात्र अजूनही निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी संप सुरुत ठेवला.

महाराष्ट्र सेंट्रल मार्डच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात येतील यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. मात्र याबाबत सरकारने लेखी आदेश काढले नसल्याने मार्डचा प्रस्तावित बेमुदत संप सुरुच राहणार आहे. दरम्यान जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे,

दरम्यान आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने निवासी डॉक्टरांनी अनोखा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील काही मेडिकल कॉलेजेसमध्ये रक्तदान शिबिर भरवण्यात येणार आहे. 

राज्यभरातील 5 हजाराहूंन अधिक निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. राज्यातील जवळपास 18 मेडिकल कॉलेजमधील सुमारे सव्वा पाच हजार निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केलाय. कोरोना काळातील फी माफ करण्यात यावी ही डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.

कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचं स्पष्ट केलंय.