सत्तालोलूप भाजपच्या विकृतीचा हा पराभव - शिवसेना

राज्यात भाजपबरोबर सत्तेत असूनही विरोधकांचं काम करणाऱ्या शिवसेनेनंही भाजपच्या या नाचक्कीवर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

Updated: May 19, 2018, 05:44 PM IST
सत्तालोलूप भाजपच्या विकृतीचा हा पराभव - शिवसेना title=

मुंबई :  कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारं ११२ आमदारांचं मत आपल्याकडे असणं अशक्य आहे, हे लक्षात आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री  बी एस येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनाम देणं योग्य वाटलं... सभागृहात भावूक भाषण करत येडियुरप्पांनी आपण राजीनामा राज्यपालांकडे सोपवत असल्याचं सांगितलं आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते तिथून बाहेर पडले. हरएक प्रयत्न केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागल्यानं भाजप तोंडावर पडलंय... पण, यामुळे भाजपविरोधकांना मात्र अत्यानंद झालाय. राज्यात भाजपबरोबर सत्तेत असूनही विरोधकांचं काम करणाऱ्या शिवसेनेनंही भाजपच्या या नाचक्कीवर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

हुकूमशाही व मनमानीच्या अंताची ही सुरुवात आहे... कर्नाटकात जे घडले ते लोकशाही विरोधी होते, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

पण कोणत्याही मार्गाने निवडणूका जिंकू शकतो आणि सत्ता हस्तगत करू शकतो, या विकृतीचा हा पराभव आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. 

राहुल गांधींची टीका

कर्नाटक राज्यातलं भाजपचं तीन दिवसांचं सरकार कोसळल्यानंतर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या खरेदीमागे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह असल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचाराविरोधात ओरडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा यामुळे फाटल्याची टीकाही त्यांनी केली. तर पंजाबनंतर काँग्रेसचा हा दुसरा विजय असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांतही सर्व विरोधकांना एकत्र घेऊन भाजपला हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याद्वारे व्यापक आघाडीचे संकेतच राहुल गांधींनी दिले.