मुंबई : कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 'आज मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो. मी काहीही पाहिलं नाहीये, मला आज काहीच माहिती नाहीये,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, एवढच म्हणाले. तसंच कंगनाला महापालिका क्वारंटाईन करणार का? असा प्रश्नही संजय राऊत यांना विचारला, तेव्हा याबाबत महापौर सांगतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान कंगना राणौत विषयावर बोलू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या काही भागाचं पाडकाम महापालिकेने केलं, याबाबत न बोलण्याचा पक्षादेश शिवसेनेने दिला आहे. मुंबई मनपाने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप भाजपने केला. कंगना प्रकरणावर शिवसेनेने मात्र आता मौन बाळगलं आहे.
कंगना राणौतच्या कार्यालयातील काही भाग अवैधरित्या बांधल्याचं सांगत बीएमसीने या कामावर बुल्डोझर चालवला. पण मुंबई हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती दिल्यानंतर हे पाडकाम थांबवण्यात आलं.
दरम्यान कंगना राणौत काहीच वेळापूर्वी मुंबईमध्ये दाखल झाली. त्यावेळी विमानतळावर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडून आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे आरपीआयचे काही कार्यकर्ते विमानतळावर कंगनाला पाठिंबा देण्यासाठी जमले होते. कंगनाला मुंबईत आल्यानंतर सुरक्षा देऊ, असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं होतं.