संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated: Jun 24, 2020, 09:50 PM IST
संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार title=

मुंबई : संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार सूत्र स्वीकारणार आहेत. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. 

दरम्यान सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता १ जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

१९८४ च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील. 

अजोय मेहता यांना याआधी दोनवेळा मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली होती. त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांचा विरोध होता. मेहतांना पुन्हा मुदतवाढ दिली असती तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता होती.