मुंबई : 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ठाकरे चित्रपटात संभाजी महाराजांबाबतच्या एका दृष्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. नवाजुद्दीनच्या त्या दृष्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध दर्शवला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ठाकरे हा सिनेमा आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. असे असताना संभाजी महाराजांच्या एका दृष्यावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने या सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाकरे सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात ठाकरेंचा आवाज नव्याने लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात चपला घालून पुष्पहार पुष्पहार अर्पण करताना दिसतो आहे. याच दृश्याला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके, प्रवक्ते शिवानंद भानोसे यांनी ही भूमिका मांडली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना मांडत हे दृश्य सिनेमातून काढून टाकण्याची मागणी ढोके यांनी केली आहे. हे दृश्य काढले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असाही इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी जाणूनबुजून हे केलेले आहे. मुंबईत प्रेस घेतली आहे. निवेदन दिले आहे. जर हे दृश्य काढले नाहीतर आमचा विरोध आहे. हे दृश्य काढले तर आमचा विरोध नाही, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानोसे यांनी दिली. संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. मात्र या सिनेमातला एक प्रसंग संभाजी राजांचा अपमान करणारा आहे. सिनेमातील हे दृश्य काढून टाकण्यात यावे. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी यासंदर्भातला निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा ढोके यांनी दिला आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.