प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या श्रद्धेसोबतच मंदिर आणि मंदिरांसभोवतीच्या व्यावसायिकांची होणारी उपासमार लक्षात घेऊन ही मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी मोठ्या प्रमाणात 'घंटानाद' आंदोलने करण्यात आली होती; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता; सरकारने या मागणीला परवानगी दिली नव्हती.
मात्र आता या 'देऊळ बंद'ची थेट झळ मंदिरांतील साधू आणि पुजाऱ्यांनाही बसताना दिसत आहे. बंद असलेली मंदिरे तात्काळ उघडण्यात यावीत आणि आपली ही आर्त हाक सरकारला ऐकू जावी; यासाठी विरार-खानीवड़े येथील शिव मंदिराच्या एका पुजाऱ्याने तब्बल २१ दिवस 'खड़ी तपश्चर्या' करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी श्री शिवनाथ असे या पुजाऱ्याने नाव असून आज त्यांच्या तपश्चर्येचा दुसरा दिवस आहे. आपल्या या तपश्चर्यायुक्त अनोख्या आंदोलनातून हा पुजारी सरकारचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे आपल्या या 'खड्या तपश्चर्या'दरम्यान पुजारी एका पायावर उभे राहून २१ दिवसांत केवळ फलाहार घेणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मात्र मंदिर उघडण्याची चिन्हे नाहीत. बंद असलेली ही देवळे आणि मंदिरे तात्काळ उघडण्यात यावीत; यासाठीच आपण हे महत्प्रयास करत असल्याचे या पुजाऱ्याचे म्हणणे आहे.