मुंबई : शेतकरी आंदोलनाबाबत (Farmer Protest) ट्विट केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सर्वच स्तरावरून टीका होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने, 'सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असं म्हणतं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टर दाखवत निदर्शन केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश प्रवक्ता रणजीत बागल याने सचिनच्या घराबाहेर एक पोस्टर घेऊन थेट जाब विचारला आहे. 'सचिन शेतकऱ्यांसाठी कधी ट्वीट करशील? असा फलक दाखवत बागल याने निदर्शनं केली आहे.
लोकप्रिय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं. रिहानाच्या या ट्विटला सचिन तेंडुलकरने प्रत्युत्तर दिलं आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये 'अंतर्गत बाबींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे.'
'देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या', सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर सचिन तेंडुलकरला सल्ला दिला आहे. 'लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिक्रियांना सोशल मीडियावरून विरोध होत आहे. 'आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील,' असं वक्तव्य शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.