पोस्टमन काकांचं काम हलकं करण्यासाठी पोस्टात 'रोबो'ची भरती

हा रोबो तयार केलाय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी... 

Updated: Nov 6, 2019, 10:49 PM IST
पोस्टमन काकांचं काम हलकं करण्यासाठी पोस्टात 'रोबो'ची भरती title=

दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : आजच्या डिजीटल युगातही पोस्ट खात्याचं वेगळेपण कायम आहे. आजही पञव्यवहाराला तितकेच महत्त्व असून अगदी देशभरातील ग्रामीण ते शहरी भागात पोस्टमन काका पत्र पोहचवतातच... याच पोस्ट कार्यालयात आता चक्क रोबो काम करताना दिसणार आहे.  हा रोबो तयार केलाय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी... सध्या यंञ रुपात असला तरी हा रोबो लवकरच पोस्ट खात्यात काम करताना दिसणार आहे. पोस्टमन काकांचे काम हलकं करण्यासाठी या रोबोची लवकरच मुंबईच्या जीपीओमध्ये (General Post Office) भरती होणार आहे.


आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबो

आजही पोस्टाच्या कार्यालयात देश विदेशातून आलेली पत्रं पीन कोड आणि पत्त्यानुसार वेगळी करण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. यात वेळ जात असल्याने पत्र पोहचवण्यासही पोस्टाला काही किमान दिवस द्यावे लागतात. पण आता काळजी करु नका. कारण पत्रांचं सॉर्टिंग करण्याचं काम आता खुद्द रोबो करणार आहे.

 


आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबो

कलर कोडच्या सहाय्याने हा रोबो सध्या एक खोकं हव्या असलेल्या जागेवर ठेवू शकतो. आयआयटी बॉम्बेच्या डिजाईन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केलाय. याचा डेमो नुकताच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. 

या रोबोमुळे पोस्टमनचं पत्रं पोहचवण्याची कामं हलकी होणार नाहीत. पण त्यांचा बराचसा वेळ पत्रांना पत्त्यानुसार वेगळं करण्याच्या कामात जात होता. ते काम आता जलद गतीने परफेक्ट कसं होईल यासाठी आम्ही आयआयटीशी संपर्क साधला. प्रायोगिक तत्वावर याला सुरुवातीला वापरणार असल्याचं पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी म्हटलंय. 


आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबो

आयआयटीचे विद्यार्थी यावर आणखी संशोधन करुन त्यानंतर हा रोबो बाजारात आणण्याचा विचार करणार आहेत. पूर्वीप्रमाणे आता मोठ्या संख्येने पत्र व्यवहार होत नसला तरी आजही व्यावसायिक पत्रव्यवहाराचे स्वरुप मोठं आहे. शिवाय, ग्रामीण भागातही पोस्टाचाच वापर होत असल्याने बदलत्या काळातही पोस्टाला डिजिटल करण्याच्या दिशेने ही पावलं उचलली जात आहेत, असंच म्हणावं लागेल.