Third Mumbai Ring Road: मुंबई शहर -उपनगर आणि नवी मुंबई परिसराचा वेगाने विकास होत आहेत. लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळं आता तिसरी मुंबई आकारास येत आहे. तिसरी मुंबई ही मुंबई आणि नवी मुंबईचा मध्य आहे. नवी मुंबई विमानतळाच्या लगतच ही तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या मुंबईला मुंबई व नवी मुंबईशी जोडण्यासाठी तिसऱ्या रिंग रोडचा पर्याय उपलब्ध केला जात आहे. मुंबईमध्ये पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि नवी मुंबईला हा तिसरा रिंग रोड जोडण्यात येईल. (Ring Road Connect Third Mumbai)
हैदराबाद आणि अहमदाबाद शहराच्या धर्तीवर एक एक्सेस कंट्रोल रिंग रोड निर्माण केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार करण्यात येईल.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात तिसऱ्या मुंबईला जोडणार रिंग रोड प्रकल्पाबाबत उल्लेख केला होता. या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्याचबरोबर, राज्य सरकार ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा क्षेत्रात पुण्यातील पीएमपीएलच्या धर्तीवर बसससेवा सुरू करण्याचा प्रस्तावावर विचार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तिसरी मुंबई नावाचे नवे शहर वसवण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई ट्रानहार्बर लिंक रोडद्वारे हे शहर जोडले जाणार आहे. तिसरी मुंबई हे शहर वसवण्यासाठी पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडकोकडून तब्बल 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यात रस्ते उभारण्यात येणार आहेत. नैना क्षेत्रातील या 23 गावांच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला काम दिले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. विमानतळाच्या पूर्वेकडे असलेल्या पनवेल, उरण तालुक्यात असलेल्या 23 गावांचा विकास नैना योजनेंतर्गंत होत आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसराचाही या योजनेंतर्हंत विकास होत आहे.
तिसरी मुंबई या नवीन शहरात हायटेक सुविधा असणार आहेत. उत्तम घरे, वाहतूक सुविधा आणि पायाभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळं मुंबई - नवी मुंबई ही शहर जवळ आली आहेत. तर, ह्याच सेतूमुळं तिसरी मुंबईदेखील जोडण्यात येणार आहे. तिसरी मुंबईत व्यावसायिक संकुले, शाळा, रुग्णालय, मैदान यासारख्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.