मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेकाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.
कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.
दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.
कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.