मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यात येणार आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार आ आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. लवकरच यासंदर्भातला अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे.
पण तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याच्या निर्णयाबद्दल महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानंच सरकारला घरचा आहेर दिलाय. आज पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारविरोधात ठराव करण्यात आला. 'महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी, दोन सदस्य प्रभाग रचनेच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
दोन सदस्य प्रभाग पद्धतीन निवडणुकीचा योग्यरित्या प्रचार केला जाऊ शकतो, आम्ही पक्ष म्हणून मत मांडलं आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी म्हटलं आहे. निर्णय सरकारला घ्यायचा आहे, पण आम्ही लोकांची मतं मांडली आहेत, जनतेचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही भूमिका मांडणं काँग्रेसचं काम आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
एकीकडे दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी ही काँग्रेसची मागणी आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या विकासासाठी एकमताने त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, प्रभाग पद्धतीवरुन महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या कुरुबुरीवर भाजपने टीका केली आहे. राज्यमंत्रीमंडळात प्रस्ताव आला त्यावेळेस चर्चा होणे गरजेचं असतं, पण महाविकास आघाडी जन्मापासूनच एकमेकांची नाराजी काढण्यात उर्जा खर्च करत आहे. एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू, तीन पक्षांची आपण श्रेष्ठ दाखवण्यात चढाओढ सुरु असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.