राज्यातील यात्रांवर कोरोनाचे सावट

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या पाहता देशाच्या इतर भागांमध्ये सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Updated: Mar 7, 2020, 12:32 PM IST
राज्यातील यात्रांवर कोरोनाचे सावट title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजित होणाऱ्या यात्रांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात मोठ्याप्रमाणावर लोक एकत्र जमणार नाहीत, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी लोकांना मेळावे आणि यात्रांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यभरातील यात्रा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. 

राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या यात्रा सुरु आहेत. यानिमित्ताने ग्रामीण भागात पर्यटकांची आणि चाकरमन्यांची ये-जा होते. या सगळ्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला काहीप्रमाणात का होईना, चालना मिळण्याचे काम होते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे बहुतांश यात्रा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. 

कोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या पाहता देशाच्या इतर भागांमध्ये सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील निवडक रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी स्वतंत्र (आयसोलेटेड) कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

यानंतर आता राज्य सरकारने राज्यातील जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये quarantine कक्ष, Isolation कक्ष आणि चाचणी कक्ष उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोना व्हायरससंदर्भात राज्यातील आशा वर्कर्सना ११ ते १३ मार्च दरम्यान ट्रेनिंग दिले जाणार आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे क्रिकेट आयपीएल स्पर्धाही लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.